Satara | सरसकट आले खरेदी करा, अन्यथा कारवाई

कोरेगाव,(प्रतिनिधी) – संगनमताने होत असलेली आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी व्यापा-यांनी सरसकट आले खरेदी करावे. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणार्या आले व्यापारी व तेथील बाजार समितीवर कारवाई केली जाईल, त्यासाठी पुढे-मागे पाहिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पणनमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे मंगळवारी सकाळी १० वाजता राज्यभरातून आलेल्या आले उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना, पणन विभागाचे अधिकारी आणि बाजार समितीच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत बोलताना ना. सत्तार यांनी इशारा दिला. यावेळी व्यापार्यांच्या चुकीच्या भूमिकेवर ना. सत्तार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सातारा, छत्रपती संभाजीनगर व सांगली जिल्ह्यामध्ये सरसकट आले खरेदी सुरु रहावी, प्रतवारीनुसार आले खरेदी रोखावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनास शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाची धग राज्य सरकारपर्यंत गेलेली असून, स्वत: मंत्र्यांना या विषयात लक्ष घालण्याची वेळ आली आहे.
आल्याचे दर वाढल्यानंतर आले खरेदीमध्ये जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकर्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे आले उत्पादक अडचणीत सापडला आहे. त्यापार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी आवाज उठवला होता, त्यावर राज्य सरकारच्यावतीने मंत्री ना. सत्तार यांनी सरसकट आले खरेदीबाबत भूमिका जाहीर करुन तसे लेखी आदेश पणन विभागामार्फत देत असल्याचे जाहीर केले होते.
सध्या व्यापारी बांधावर खरेदी करताना जुन्या आले पिकाला ७६ रुपये प्रति किलो करणारे नवीन आले पिकाला १६ रुपये प्रति किलो दर देत आहेत. त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झालेला आहे, अशी बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, कृषिभूषण भाऊसाहेब थोरात, मनोहर साळुंखे, अनिल गायकवाड, सुर्यकांत पवार, संजय नलवडे, दत्तुकाका घार्गे,
शरद खाडे, संतोष तुपे, विक्रम इनामदार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी ना. सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी सरसकट आले खरेदीबाबत सरकारचे धोरण स्पष्ट आहे, त्याची अंमलबजावणी न करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी जागेवरच पणन विभागाच्या अधिकार्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
कोरेगाव बाजार समिती पदाधिकार्यांचा सत्कार
राज्य सरकारने सरसकट आले खरेदीबाबत सुस्पष्ट भूमिका घेतली आहे, तसे निर्देश त्यांनी पणन विभागाला दिले आहेत. तत्पूर्वी शेतकरी हितासाठी सरसकट आले खरेदी व्हावी, यासाठी शेतकरी संघटनेसह आले उत्पादक शेतकरी व व्यापार्यांशी समन्वय ठेवत बैठका घेऊन परिस्थिती योग्यपणे हाताळल्याबद्दल कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांच्यासह राज्यातील अन्य बाजार समितीच्या पदाधिकारी व सचिवांचा यावेळी मंत्री ना. सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.





