Rajendra Pawar : “….पण काकांना नेहमी पुतणेच दिसतात “; राजेंद्र पवारांनी व्यक्त केली मनातली खदखद

Rajendra Pawar : आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी इंदापूर तालुक्यातील भवानीगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार कुटुंबात प्रत्येक काकाने आपल्या पुतण्याला पाठबळ दिले आहे, हीच आमची रीत असं विधान केलं आहे. त्यांनी या विधानातून अजित पवारांना मिश्किल टोला लगावला आहे. याशिवाय त्यांनी एका गोष्टीला घेऊन मनातील खदखद थेट जाहीर कार्यक्रमात बोलून दाखविली आहे.
इंदापूर तालुक्यातील भवानीगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राजेंद्र पवार यांनी शेती, राजकारण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयला घेऊन मत मांडलं. राजेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाची आठवण यावेळी बोलताना सांगितली. या आठवणीतून त्यांनी काका पुतण्याचा दाखल दिला आहे.
…पण काकांना नेहमी पुतणेच दिसतात.
अजित दादा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा आप्पासाहेबांनी त्यांना साथ दिली. नवख्या उमेदवाराला किती मते मिळतात, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यानंतर दादांनी ३५ वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी नेतृत्व केले, असं राजेंद्र पवार यांनी सांगितलं. पुढे बोलताना राजेंद्र पवार म्हणाले छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मला वाटलं माझे वडील माझा विचार करतील, पण काकांना नेहमी पुतणेच दिसतात. तिथे मला संधी मिळाली नाही आणि वडिलांनी अजित दादांना पुढे केलं, अशी मनातली खदखत राजेंद्र पवार यांनी बोलून दाखवली.
अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर मिश्किल टोला
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राजेंद्र पवार यांचे चिरंजीव आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिले. विधानसभेच्या निवडणुकीत पोस्टल मते ही त्यांच्यासाठी निर्णायक ठरल्याचं सातत्याने सांगितलं जातं. या गोष्टीला घेऊन अजित पवार यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता काहीजण पोस्टल मतांवर निवडून येतात असं विधान केलं होतं. या विधानावर राजेंद्र पवार यांनी प्रत्युत्तर देत पण वेळ बदलते, काळ बदलतो, असं म्हटलं आहे.
हेही वाचा : विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा होणार सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी





