Kangana Ranaut : …पण लढा मात्र शेजारच्या देशासाठी देतात; कंगना रणौतची नसीरुद्दीन शाहांवर बोचरी टीका
Kangana Ranaut : कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली.

Kangana Ranaut and Naseeruddin Shah : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थी आंदोलनांबाबत बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपटसृष्टीची तुलना तोंडात हाड धरलेल्या कुत्र्याशी केली होती. त्यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत कंगनाने त्यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला.
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली. “प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा कुत्रा असतो, पण मी ज्या घरात खाते, त्या घराचे म्हणजेच माझ्या देशाचे रक्षण करण्याचा मला अभिमान आहे. नसीरुद्दीन साहेब या देशात राहतात, पण लढा मात्र शेजारच्या देशासाठी देतात,” असे ती म्हणाली.
यावेळी कंगनाने कुत्र्यांच्या निष्ठावान स्वभावाचे कौतुक करत, “आजच्या काळात कुत्रा म्हटले जाणे हे कौतुकास्पद आहे. कारण ते निष्ठावान आणि प्रेमळ असतात,” असे नमूद केले. त्यानंतर तिने नसीरुद्दीन शाह यांचा उल्लेख “कोल्हा” असा करत, त्यांच्यासारखे होण्यापेक्षा कुत्रा होणे पसंत असल्याचे म्हटले.
दरम्यान, कंगनापूर्वी अभिनेता आणि लेखक पियुष मिश्रा यांनीही नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. झारखंडमधील रांची येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शाह यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत काही सवाल उपस्थित केले होते.
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ न बोलणाऱ्यांवर टीका करणाऱ्या शाह यांच्या भूमिकेचा उल्लेख करत मिश्रा यांनी, “जर काही लोक तोंडात हाड असल्यामुळे बोलत नसतील, तर इतर गप्प बसलेले लोक कुठे आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला होता.
बोलताना पियुष मिश्रा यांनी नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल आदर असल्याचे स्पष्ट केले. मात्र, “मी त्यांचा सन्मान करतो, पण आता त्यांना घाबरत नाही,” असेही त्यांनी म्हटले. पियुष मिश्रा यांच्या प्रतिक्रियेनंतर आता कंगना रणौतच्या वक्तव्यामुळे नसीरुद्दीन शाह यांच्याभोवतीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






