“१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान..”; आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील विषयावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलना मध्ये शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा त्यांनी जाहीर सभेमधून केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. यावेळी त्यांनी बाबरी पडली त्यावेळी एकही शिवसैनिक त्यात सहभागी नव्हते असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याचा आता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. याविषयी बोलताना त्यांनी,” “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल,” अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया देत त्यांच्या दाव्यावर सडेतोड उत्तर दिले.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरेंनी याव्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र दिनी झालेल्या दोन्ही सभांचा उल्लेख करत आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढतोय, असे म्हटले. तसेच आम्ही मूळ मुद्द्यांवर काम करतोय. महाविकास आघाडी सरकार हे लोकांची कामं करत आहे. लोकांची चूल कशी पेटती राहील यासाठी आम्ही काम करतोय, परंतु, राज्यातील विरोधी पक्षातील नेते लोकांची घरं पेटवण्याची कामं करत असल्याचा टोलादेखील आदित्य ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, “बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असे फडणवीस यांनी भाषणात म्हटले आहे. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असे विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केली होती.





