इस्लामाबाद : पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाने २६ नोव्हेंबर रोजी राजधानी इस्लामाबादमध्ये केलेल्या आंदोलनप्रकरणी इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना स्थानिक न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. पीटीआयच्या आंदोलनाशी संबंधित ३२ प्रकरणांमध्ये हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मध्ये इम्रान खान, बुशरा बिबी आणि त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याविरोधातल्या निमलष्करी दलातल्या ३ सैनिकांच्या हत्येच्या प्रकरणाचाही समावेश आहे. आंदोलनादरम्यान पाक रेंजर्सच्या ३ सैनिकांना पीटीआयच्या कार्यकर्त्याने कारखाली चिरडून मारल्याचा आरोप होता. रावळपिंडीतल्या दहशतवादविरोधी न्यायालयाने बुशरा बिबी यांना १३ जानेवारीपर्यंत हंगामी जामीन मंजूर केला. पीटीआयच्या आंदोलनाचे नेतृत्व बुशरा बिबी यांच्यासह खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर यांनी केले होते. या आंदोलनप्रकरणी बुशरा बिबी यांच्याविरोधात रावळपिंडी, अटोक आणि चाकवाल जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांमध्ये प्रकरणे दाखल झाली आहेत. जमावाला हिंसेसाठी चिथावणी देणे, सरकार आणि लष्कराविरोधात उठावाची प्रेरणा देणे आणि हिंसाचार घडवण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल आहे.