सावधान.. एसटीमुळे तुम्हाला जबर इजा होऊ शकते

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसमुळे नागरिकांना जबरदस्त इजा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्गावर पत्रा बाहेर आलेल्या धोकादायक बसेस सोडण्यात येत असून त्यामुळे नागरिकांच्या जिवीताला धोका पोहोचू शकतो. हा पत्रा एखाद्याला कापल्यास हकनाक बळीही जाऊ शकतो.
स्वारगेट येथील जेधे चौकात भोरला जाणाऱ्या एसटीच्या डाव्या बाजूचा पत्रा फाटल्याचे बुधवारी दुपारी दिसून आले. हा पत्रा सुमारे एक इंच बाहेर आल्याने अन्य वाहनचालकांना, खासकरून दुचाकीस्वारांना धोकादायक ठरू शकतो.
मात्र, याचे गांभीर्य एसटी प्रशासनाला नसून अपघातामुळे बाहेर आलेला पत्रा दुरुस्त करण्याची तसदीही घेतली गेली नाही, असे धक्कादायक चित्र या निमित्ताने समोर आले.
दरम्यान, पुणे विभागात अशा पत्रा बाहेर आलेल्या एसटी बसेसची संख्या पन्नासच्या पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.




