आळेफाटा : राज्य परिवहन महामंडळाच्या नारायणगाव एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नारायणगाव आगारातून सुटणार्या मुक्कामी गाड्या म्हस्केवाडी, झापवाडी, साकोरी यांसारख्या गावांमध्ये नियमितपणे पोहोचत नसल्याने प्रवाशांना अनेकदा रस्त्यावरच अडकून बसावे लागत आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. नारायणगाव आगाराच्या मुक्कामी गाड्या गावात येतीलच याची कोणतीही हमी प्रवाशांना राहिलेली नाही. अनेकदा बस अर्ध्या रस्त्यातच थांबते किंवा मुक्कामाच्या ठिकाणी न जाता परत फिरते, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून बेल्हे एसटी बसस्थानका तील वाहतूक नियंत्रण कक्ष बंद असल्याने प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेणारे किंवा मार्गदर्शन करणारे कोणीच नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी प्रवाशांना कोणतीही माहिती मिळत नसून गैरसोय वाढत चालली आहे. अलीकडेच नारायणगाव आगारातून झापवाडी मुक्कामी येणारी बस अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे बेल्हे बसस्थानकावर उतरलेल्या सात महिलांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले.शेवटी त्यांनी अव्वाच्यासव्वा प्रवासभाडे मोजून खाजगी वाहन करून घरी जावे लागल्याची घटना घडली. परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांची दहशत असतानाही अशा प्रकारे प्रवाशांना रस्त्यावर सोडले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी मानली जाते. मात्र मुक्कामी गाड्यांच्या अनियमिततेमुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नारायणगाव एसटी आगाराचा हा भोंगळ कारभार थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक आणि प्रवासी करत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकार्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मुक्कामी गाड्या नियमित सुरू कराव्यात, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नारायणगाव एसटी आगारप्रमुख कार्यालयात संपर्क साधला असता जबाबदार व्यक्ती उपलब्ध होऊ न शकल्याने मुक्कामी गावच्या बंद गाड्यांची माहिती मिळू शकली नाही. या भागात बिबट्याच्या हल्ल्यांची भीती कायम आहे.अशा परिस्थितीत रात्री महिलांना रस्त्यावर सोडणे अत्यंत धोकादायक आहे. मात्र एसटी महामंडळा च्या नारायणगाव आगार प्रमुखांकडून या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. -विश्वास गोरे, झापवाडी ज्येष्ठ नागरिक हेही वाचा : Pune District : दुबईतील तणावातून सुटका… जाधव कुटुंब सुखरूप मायदेशी