सहलीला गेलेल्या इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांच्या बसला बारामतीत अपघात

अपघातात तीन मुली गंभीर तर 24 मुली किरकोळ जखमी
डोर्लेवाडी : इचलकरंजी येथून शिर्डी व औरंगाबाद येथून सागर क्लासेसच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थिनींच्या बसला माघारी परतताना बारामतीतील पाहुणेवाडी येथे पहाटे तीन वाजता अपघात झाला.यात ३ मुली गंभीर तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. यात बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

इचलकरंजी येथील सागर क्लासेस या खाजगी क्लासेसच्या वतीने इचलकरंजी ते शिर्डी, औरंगाबाद अशी सहल विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात आली होती. यात 48 विद्यार्थिनी व 4 शिक्षकांना घेऊन ही बस शिर्डीहून बारामतीमार्गे इचलकरंजीला निघाली होती
यावेळी बारामतीवरून पाहुणेवाडी येथे पोहोचल्यानंतर बस चालकाला अंदाज न आल्याने व चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून बस थेट खाली गेली. यामध्ये तीन मुली गंभीर जखमा झाल्या तर २४ मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे.
जखमींना उपचारासाठी बारामतीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती माळेगाव पोलीस करीत आहेत.





