Bus Fire : धावत्या खासगी बसला भीषण आग! बघता बघता झाला कोळसा ; चालक-प्रवाशी थोडक्यात बचावले

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास एका खासगी बसने अचानक पेट घेतला. या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी बस (एमएच 12 व्हीएफ 6526) नगरहून पुण्याकडे जात असताना डिंग्रजवाडी फाट्याजवळ बसमध्ये अचानक धूर निघू लागला.
काही क्षणांतच बसने पेट घेतला. प्रसंगावधान दाखवत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली व सर्व प्रवाशांना त्वरित बाहेर उतरवले. काही क्षणांतच बसला भीषण आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलहस निरीक्षक राहुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलहस हवालदार श्रावण गुपचे, नवनाथ नाईकडे, हेमंत कुंजीर, प्रताप कांबळे, तसेच पोलहस पाटील मालन गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते साईनाथ गव्हाणे, किरण सव्वाशे, प्रवीण राऊत, गोरक्ष दौंडकर यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला.
यानंतर पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला. अग्निशमन दलाचे प्रमुख शुभम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शुभम बढे, सूरज इंगवले, योगेश पाटील, कृष्णा नागरे, सिद्धार्थ जाधव आदी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळवले. दरम्यान, कोरेगाव भीमात गुरुवारी आठवडे बाजार असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी होती.
त्यामुळे आग लागल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा प्रयत्न करून कोंडी दूर केली.सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.





