Bus Blast in Israel । इस्रायलमध्ये काल रात्री अचानक पाठोपाठ अनेक बसेमध्ये बोमोबस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य इस्रायलमधील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन बसेसमध्ये हे स्फोट झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर इतर दोन बसमध्येही स्फोटके सापडल्याने अधिकाऱ्यांना हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे. काही दिवसांपूर्वी लेबनानमध्ये पेजर अटॅक करण्यात आला होता त्याचा बदल म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इस्रायल हल्ल्यात आतापर्यंत कोणीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही. गाझा युद्धबंदी दरम्यान सुरू असलेल्या कैद्यांच्या देवाणघेवाणीदरम्यान हे स्फोट झाले आहेत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुरक्षा बैठक बोलावली आहे. पोलिसांनी दिली माहिती Bus Blast in Israel । इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस प्रतिनिधी असी अहारोनी यांनी दोन अतिरिक्त बसमध्ये स्फोटके सापडल्याची पुष्टी केली. तसेच अधिकाऱ्यांनी,” पाचही बॉम्ब एकसारखे होते आणि त्यामध्ये वेळेचे यंत्र बसवले होते. बॉम्ब निकामी पथकाने न फुटलेले स्फोटके निकामी केली आहेत” अशी माहिती दिली. पोलिस प्रवक्ते हैम सरग्रोफ यांनी इस्रायली वृत्तवाहिनीला सांगितले की, “एकाच व्यक्तीने अनेक बसेसमध्ये स्फोटके पेरली होती की अनेक गुन्हेगारांचा यात सहभाग होता हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सारग्रोफ यांनी या स्फोटकांमध्ये आणि पश्चिम किनाऱ्यावर सापडलेल्या स्फोटकांमध्ये साम्य असल्याचे सांगितले, परंतु अधिक तपशील दिले नाहीत. “हा एक मोठा स्फोट होता, परंतु कोणीही जखमी झाले नाही कारण स्फोटाच्या वेळी बसेस रिकाम्या होत्या आणि पार्किंगमध्ये उभ्या होत्या,” असे बॅट यामच्या महापौर त्झविका ब्रोट यांनी एका निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सुरक्षा बैठक घेणार Bus Blast in Israel । दरम्यान, मध्य इस्रायलमध्ये सार्वजनिक बसेसमध्ये झालेल्या स्फोटांच्या मालिकेनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सुरक्षा बैठक घेणार आहेत. “पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांच्या लष्करी सचिवांकडून आयईडी घटनांबद्दल सतत अपडेट मिळत आहेत आणि लवकरच ते सुरक्षा मूल्यांकन करतील,” असे पोलिसांनी तीन बस स्फोट आणि दोन अतिरिक्त उपकरणे निष्क्रिय केल्याची बातमी दिल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.