प्रभात वृत्तसेवा अवसरी – पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरजवळील नंदीचौक गायमुख येथे आळंदीवरून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी निघालेल्या नागपूर येथील भाविकांच्या एका बसने समोर चाललेल्या माल ट्रकला मागून धडक दिली.या अपघातामध्ये बसमधील ३० भाविक जखमी झाल्याची घटना मंगळवार, दि.११ रोजी रात्री ९ वाजता घडली.आराम खाजगी बस (क्रमांक एमएच 31 ईएम 2786) ही बस भाविकांना आळंदी येथून देवदर्शनासाठी भीमाशंकर येथे जात होती. नंदीचौकात समोर चाललेल्या मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच १२ क़्युडब्लू 8644) ला मागून धडकली. ट्रकमध्ये पुठ्ठ्याचा माल होता.जखमी झाले असून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डॉ. साहिल टाके, डॉ. विवेकानंद फसाले, डॉ.अश्विनी घोडे इत्यादी सहकाऱ्यांनी जखमी भाविकांवर उपचार केले. अपघातामुळे महिला भाविकांमध्ये घबराट पसरली. अपघाताची माहिती कळताच नागपूर अभियंता संघटनेचे सचिव गणेश शहारे यांनी राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर यांना कळविल्यानंतर, पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उभे यांनी तातडीने मदतीचे चक्र फिरवून भाविकांसाठी जेवण व मुक्कामाची सोय केली.अभियंता अक्षय इंदोरे, उपसरपंच मयूर तांबडे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास भोर यांनी घटनास्थळी जाऊन मानसिक आधार देत तांबडेमळा येथे चालू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात ग्रामस्थांच्या वतीने निवासाची आणि जेवणाची सोय केली.अपघातस्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.