पुणे | कामगारांच्या २० झोपड्या जाळून खाक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्याना आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन एक तासात आग आटोक्यात आणली.
सुसगाव येथे बेलाकासा इमारतीशेजारी कामगारांसाठी पत्रा शेडच्या ५० झोपडपट्या आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. त्यानंतर औंध, पाषाण, कोथरुड, वारजे येथील बंब तसेच एक वाॅटर टँकर आणि पीएमआरडीए दोन बंब व वॉटर टँकर , हिंजवडी एमआयडीसी येथील १ बंब अशी ९ वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली.
पत्रा शेडमध्ये कोणी अडकले आहे का, हे तपासत जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. आग इतर झोपड्यांमध्ये पसरू नये, याची खबरदारी घेत पुढील धोका दूर केला. या आगीत झोपडपट्टीतील घरगुती वापराच्या तीन गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाले. यामुळे आग भडकली. तसेच घरगुती वापराचे छोटे-मोठे २८ सिलिंडर्स जळाले.
घटनास्थळी कामगारांच्या ५० पैकी २० झोपड्या पूर्णपणे जळाल्या. यातील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी बचावकार्य केले.
आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरत्र पसरू न देता मोठा धोका टाळला. सिलिंडर्स मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचाही स्फोट झाला असता, तर मोठी हानी झाली असती. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा





