nagar | शेवगाव, पाथर्डी परिसरात घरफोडी करणारे जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – शेवगाव व पाथर्डी परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारे सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील चोरीचे सोने एका मध्यस्थीमार्फत विकण्यासाठी शेवगावातील सरकारी दवाखान्या जवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ९४. ५ ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने असा ६ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लखन विजय काळे (वय २२, रा. शेवगाव), गोरख हैनात भोसले (वय २४, रा. घोसपुरी, ता. जि. नगर), सोनाजी एकनाथ गर्जे, वय ५२, रा. गर्जेवस्ती, गेवराई रोडे, शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोनाजी एकनाथ गर्जे याचे कब्जातून सोन्याचे दागिने मिळाले.
हे दागिने पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे, शिरसाठवाडी व जोगेवाडी, व चांदगाव व पिंगेवाडी, ता. शेवगांव तसेच शेवगाव शहरातुन घरफोडी चोरी करुन आणले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपी लखन विजय काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये दरोडा, घरफोडी व चोरीचे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार काळे हा शेवगाव तालुक्यातील सरकारी दवाखान्याजवळ चोरीचे दागिने विकण्यासाठी येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब गोविंद काळे, रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजु काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.





