बैलगाडा शर्यत! ३०९ गाड्यांची झुंज अन् लाखो रुपयांची बक्षिसं; पाहा कोण ठरलं फळीफोड?

प्रभात वृत्तसेवा
महाळुंगे पडवळ – फुलेवाडी-महाळुगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत ३०९ बैलगाड्यांनी सहभाग घेतला. पवन विठ्ठल हगवणे व दादाभाऊ खंडू मनसुख यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.श्री वेताळ महाराज यात्रा उत्सवानिमित्त काकडा, हरिपाठ व भजन आदी कार्यक्रम संपन्न झाले.
अखंड हरीनाम सप्ताहात स्वराज महाराज बनकर, गणेश महाराज घोडेकर, सिद्धेश महाराज वाबळे, विकास महाराज हगवणे, ज्ञानेश महाराज फलके, संतदास महाराज मनसुख, केशव महाराज हगवणे यांची कीर्तने व गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाले. तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.
दोन दिवस झालेल्या बैलगाडा शर्यतीत पवन विठ्ठल हगवणे व भिकाजी तुकाराम चव्हाण हे फायनल शर्यतीचे मानकर ठरले. विजेत्या बैलगाडा मालकांना सरासरी दोन लाख ५० हजार रुपये रोख रक्कम विभागून देण्यात आली.महाळुंगे पडवळ ते वेताळ महाराज मंदिरापर्यत काठीची मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी मीनानाथ डोके यांचा मानाचा बैलगाडा होता.
यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानचे अध्यक्ष जनार्दन बनकर, सचिव नारायण घोडेकर, खजिनदार संदीप बनकर, अशोक डोके, सुनील भेळे, रमेश बनकर, संजय घोडेकर, नवनाथ डोके, देवराम डोके, राजू डोके, अनंता बनकर, श्रीकांत घोडेकर, मयूर डोके, जीवन बनकर आदींनी यात्रेची व्यवस्था पाहिली.




