Satara : भोसेखिंड, दांडेघर हद्दीतील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

भिलार : पाचगणी पासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या भोसेखिंड गावामध्ये चालू असलेले अनधिकृत बांधकाम व दांडेघर हद्दीमध्ये असलेले थापा ठिकाणावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम महसूल विभागाने शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सहा वाजल्यापासून महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी व भोसेखिंड या गावाच्या हद्दीमध्ये चालू असलेल्या अवैद्य बांधकाम पाडण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आणले आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मार्गदर्शन तालुका या महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा अवैद्य बांधकामांनी तोंड वर काढले होते. याबाबत स्थानिकांमधून अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र दुडी पुन्हा एकदा ॲक्शन मोड मध्ये आले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार खोचरे पाटील यांनी आज सकाळी सहा वाजताच कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसे व दांडेघर येथील थापा या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठ्या जेसीबी, पोकलेनच्या साह्याने अनाधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती
ही मोहीम चालू असताना महसूल विभागाचे सर्व आधिकारी, पाचगणी व महाबळेश्र्वर नगरपालिका कर्मचारी ,पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी अशा सर्वांचा ताफा या मोहिम मध्ये सहभागी झाला होता. पाचगणीत आपले छोटेसे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सामान्य माणसाच्या व स्थानिकांच्या घरांना कोणतीही नोटीस बजावू नये व कोणतीही कारवाही करू नये, असे जनसामान्यातून प्रतिक्रिया उमटत आहेत





