Buldhana School News : जि.प. शाळेला ठोकले कुलूप; शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर
Buldhana School News : बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा केंद्रीय जि.प. शाळेत शिक्षकांच्या कमतरतेविरोधात पालकांनी पुन्हा कुलूपबंद आंदोलन केले. महिन्यानंतरही कार्यवाही न झाल्याने संताप.

Buldhana School News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्दनंतर आता रोहणा येथेही शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने संतप्त पालकांनी रोहणा येथील केंद्रीय मराठी प्राथमिक जिल्हा परिषद शाळेला गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुन्हा कुलूप ठोकले आहे. दरम्यान, हिवरा खुर्द येथेही पालक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
रोहणा शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरावीत तसेच व्यवस्थित अध्यापन न करणाऱ्या शिक्षकाची बदली करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली होती. मात्र प्रशासनाकडून दखल न घेतल्याने २७ जुलै रोजी पालकांनी थेट खामगाव पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवली होती. त्यानंतरही महिनाभरात ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांनी पुन्हा शाळेला कुलूप ठोकत आंदोलन केले आहे. (Buldhana School News)
दुसरीकडे, हिवरा खुर्द येथेही शिक्षकांच्या कमतरतेविरोधात पालकांनी पंचायत समितीकडे निवेदने दिली होती. मात्र मागणी अर्धवट पूर्ण झाल्याने पालकांनी कुलूपबंद आंदोलनाचा इशारा दिला. प्रशासनाने त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. (Buldhana School News)
ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाचे दावे होत असताना शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न कायम राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रोहणा आणि हिवरा खुर्द येथील शिक्षकांचा प्रश्न प्रशासन कायमस्वरूपी कधी सोडवणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.





