Buldhana News: बुलढाण्यात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कळस, कर्मचाऱ्यांच्या चुकीचा शेतकऱ्याला फटका
Buldhana News: दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच आश्वासन

बुलढाणा : बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील केळवद येथील शेतकरी गणेश निकम यांनी आपल्या एक एकर शेतात हळदीची लागवड केली, मात्र त्या शेतात हळद ऐवजी सोयाबीन असल्याची नोंद पिक पेऱ्यावर घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे सर्वेक्षण आणि पिक पेरा नोंदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आधीच शेतकरी विविध संकटांना तोंड देताना हतबल झाला आहे. त्यात हा त्रास कमी की काय त्यात भर टाकण्याचं काम महसूल कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपना आणि हलगर्जपणाचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. केवळ कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे पीक कर्ज, पिक विमा आणि नुकसान भरपाई अशा तीनही लाभांमध्ये शेतकऱ्याच मोठं नुकसान होणार आहे.
या घटनेवर संताप व्यक्त करत शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत, शेतकऱ्याच्या बाबतीत गांभीर्य नसलेल्या अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, तांत्रिक बाबी पूर्ण करून चूक दुरुस्त केली जाईल, आणि या प्रकरणी चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच आश्वासन चिखलीच्या तहसीलदारांनी दिल आहे.





