Buldhana News : हृदयद्रावक ! दुष्काळाच्या झळा असह्य झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Buldhana News : राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडल्याचे चित्र आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. चोंडी टाकळेश्वर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे चोंडी टाकळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे सांगितले जात असून, सावकारी तगाद्यामुळे ते आर्थिक आणि मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, महसूलमंत्री दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असतानाच ही घटना समोर आली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर (Buldhana News) सरकारने पंचनामे, मदत आणि कर्जवसुलीबाबत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. बावनकुळे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीचा तगादा लावू नये, असे निर्देशही दिले आहेत.
यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची कमतरता, पिकांचे नुकसान आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला असून, दुष्काळग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात नापिकी, कर्जाचा वाढता भार आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्यांच्या घटनाही समोर येत आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
प्रत्यक्ष मदत कधी मिळणार?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या आधारे मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. मात्र, चोंडी टाकळेश्वर येथील घटनेमुळे सरकारी मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना तातडीचा आधार देण्याची गरज निर्माण (Buldhana News) झाली आहे.






