बुलढाणा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा अनुजा साळवे यांचे निलंबन

बुलढाणा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून महिला जिल्हाध्यक्षाचे निलंबन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनुजा साळवे यांच्यावर ही कारवाई झाली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान, अनुजा साळवे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर जातीवादाचा, अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत १५ डिसेंबर २०२४ मध्ये राजीनामा पाठवला असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील आणि मनोज कायंदे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र देत महिला जिल्हाध्यक्ष पक्ष संघटनेबाबत निष्क्रिय असल्याची तक्रार केली होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद नसून, फक्त समाज माध्यमांवर सक्रिय आहेत, असेही तक्रारीत म्हटले होते.
विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघातील उमेदवार मनोज कायंदे यांच्याविरोधात काम केले. प्रचारात सक्रिय नव्हत्या. अजितदादांची सभा होती, त्यावेळी हजेरी लावली. सभा रद्द होताच, सभास्थळ सोडले. छगन भुजबळ यांची सभा झाली. त्यावेळी त्या उपस्थित नव्हत्या. संघटन नसल्याने त्या एकट्या असतात, अशी तक्रार केली होती.





