बुलढाणा: शेतकरी दाम्पत्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, मन सुन्न करणारी घटना

बुलढाणा – जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावात शेतकरी दाम्पत्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. गणेश थुट्टे (वय 55) आणि रंजना थुट्टे (वय 50) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. शेजारी-शेजारी लटकलेले त्यांचे मृतदेह पाहून गावात शोककळा पसरली आहे. ही घटना उघडकीस आल्यावर समाजमन सुन्न झाले आहे.
थुट्टे दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सातत्याने शेतीतील नुकसान, हुमणी अळीमुळे झालेला त्रास आणि आर्थिक विवंचना यामुळे ते चिंतेत होते, अशी चर्चा परिसरात आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंताजनक विषय बनला असून, कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधक आणि शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत.
घटनास्थळी अंढेरा पोलिसांनी तातडीने दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शेतीतील संकटे आणि कर्जबाजारीपणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.





