Buldhana Bus Accident : मुलाचे ऍडमिशन करून परतत असताना गंगावणे कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह मुलीचा होरपळून मृत्यू

जळोची : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खाजगी प्रवासी बसचा पुढचा टायर फुटल्याने बस उलटी होऊन बसला आग लागली. ही घटना सिंदखेडराजा येथील पिंपळे गावाजवळ घडली असून बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
बारामतीतील वकील अमर काळे यांच्या भगिनी कांचन कैलास गंगावणे (३८), दाजी कैलास बबन गंगावणे (शिक्षक वय ४५ वर्ष), ऋतुजा कैलास गंगावणे (२१ वर्ष) सर्व रा. शिरूर जिल्हा पुणे. यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क करून सूत्रे हलवली. त्यामुळे जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डीएनए द्वारे मृतांची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे समजते.
कैलास गंगावणे हे त्यांचा मुलगा आदित्य गंगावणे याचे मेरिट मध्ये नाव आल्याने नॅशनल लॉ स्कूल नागपूर येथे त्याच्या प्रवेशासाठी वरील तिघे गेले होते. दरम्यान ते पुण्याकडे निघाले असता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळे गावाजवळ त्यांच्या बसचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
जखमींना उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. ही बस वातानुकूलित असल्याने अपघातानंतर बसचा दरवाजा जाम झाला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. अपघातानंतर बसची काच फुटल्याने बस चालक व क्लिनरला बाहेर पडण्यात यश आले. नागपुरातून बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची यादी मागवण्यात आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाने दिली आहे. परंतु मृताची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीशिवाय पर्याय नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.





