हा अपघात नव्हे, नागरिकांचा घात ! राजकीय स्वार्थासाठी रोड सेफ्टी न करताच उद्घाटन; खासदार इम्तियाज जलील यांची टीका

छत्रपती संभाजीनगर – मी याला अपघात म्हणणार नाही, हा नागरिकांचा घात आहे. हा घात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. या अपघातानंतर आज ते फक्त पाच लाख रुपये देणार असल्याची घोषणा करण्यासाठी येत आहेत. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी मीडिया इव्हेंट करून त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले, असाही आरोप त्यांनी केला.
जलील यांनी शिंदे आणि फडणवीसांवर आरोप करताना अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, हे तर दोघेही खूप ज्ञानी आहेत. थारमध्ये बसून मीडियाला सोबत घेऊन यांनी इव्हेंट केला. परंतु कुठलाही एक्स्प्रेस किंवा सुपर एक्स्प्रेस वे तयार होतो, तेव्हा रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचे क्लिअरन्स मिळाले आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? येथे का अपघात होत आहेत? मी फक्त याच अपघाताबद्दल बोलत नाही.
या महामार्गाच्या उद्घाटनावेळी फडणवीस गाडी चालवत होते आणि शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांनी हा मीडिया इव्हेंट केला. कारण त्यांना काळजी होती, की आपली सत्ता गेली, तर दुसरं कोणीतरी येऊन उद्घाटन करेल, म्हणून त्यांनी घाईघाईत महामार्गाचे उद्घाटन केले. त्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे मी आजच्या घटनेला अपघात नाही म्हणणार, ही हत्या आहे. त्याला जबाबदार आहेत महाराष्ट्राचे हे दोन नेते, जे आज पुन्हा पाच लाख रुपयांची घोषणा करण्यासाठी आले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी चढवला.
काय घडलं नेमकं अपघातावेळी
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं होतं मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. बुलढाणा येथील अपघातस्थळाची पाहाणी केल्यानंतर अमरावती आरटीओने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.





