पुणे | बिल्डरपुत्राची रवानगी व्यसनमुक्ती केंद्रात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी बाल न्याय मंडळाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवावे, असा अर्ज पोलिसांकडून दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
आलिशान कार मद्यधुंद अवस्थेत चालवून कल्याणीनगर येथे या बिल्डरपुत्राने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या बिल्डरपुत्रास बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले. त्यावर मंडळाने त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध आणि १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश दिला होता.
या निर्णयावर सर्वत्र टीका झाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. या विरोधात पोलिसांनी दाद मागितली. त्यानंतर बाल न्याय मंडळाने निकालात दुरुस्ती करून अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
विशेेष समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांची मदत
मुलाचा ताबा कोणाकडे असेल, त्याला पालकांना भेटण्याची परवानगी, तसेच मुलाची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी याबाबतचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत. गंभीर गुन्ह्यातील मुलांचे बालसुधारगृहात समुपदेशन करण्यात येते.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचे स्वरुप विचारात घेता मुलाच्या समुपदेशनासाठी विशेष समुपदेशकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच मुलाला तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांनी देखील समुपदेशन करावे. याबाबतचा अहवाल मंडळात सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





