Nagar | दुमजली व्यापारी संकुल उभारा

नेवासा, (प्रतिनिधी) – नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या पोस्ट ऑफिस समोरच्या जागेमध्ये तातडीने बीओटी तत्त्वावर दुमजली व्यापारी संकुल बांधून सदरील गाळे स्थानिक व्यावसायिकांना हस्तांतरित करण्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी निवेदन दिले
पालकमंत्री विखे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा नगरपंचायत समोरील सुमारे बारा दुकाने आगीत अकस्मात झाले. समर्पण फाउंडेशनने यापूर्वीच पोस्ट ऑफिससमोरील जागा नगरपंचायतच्या मालकीचे झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेले आहे.
या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना बांधा वापरा व हस्तांतरित करा अशा (बीओटी) तत्त्वावर दुमजली व्यापारी संकुल गाळे बांधून व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ.घुले यांनी विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
काल – परवा झालेल्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या जागेमध्ये बीओटी तत्त्वावर दुमजली व्यापारी संकुल उभारून ते गाळे स्थानिकांना व्यापारासाठी प्रदान करण्यात येऊन सद्यस्थितीत त्या जागेवर असलेल्या व्यापाऱ्यांना प्राधान्य क्रमाने द्यावे, याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी डॉ.घुले यांनी केली.





