Uddhav Thackeray : राज्यपाल भवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधा; उद्धव ठाकरेंनी केले उदयनराजेंच्या मागणीचे समर्थन

नाशिक : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिक येथील निर्धार शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवत शिवसैनिकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले. सध्या उन्हाळा खूपच तापलाय. खूप गरम झालाय महाराष्ट्र. पण हा सूर्य आग ओकत असताना आपली डोकी उन्हाने नव्हे तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी पेटली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबईतील राज्यपाल भवनाच्या जागेवर छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक बांधण्याचीही मागणी केली.
ठाकरे पुढे म्हणाले, मला बाळासाहेब व माँ साहेबांसारखे आई-वडील लाभले हे माझे भाग्य आहे. त्यांनी तुमच्यासारखी पुण्याई माझ्यामागे उभी करून ठेवली. हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण, सत्ता असली की सर्वजण त्याच्यामागे जातात. ही जगरहाटी आहे. पण सत्ता नसताना जे राहतात, तो खरा निष्ठावन व तो आपला खरा सोबती असतो. सत्यनारायणाची पूजा असली की प्रसादाला सगळेच जातात. तसे सगळे जात आहेत. जाऊद्या. पण तुमच्यासारखे खरोखर आपण ज्याला वाघाचे छावा म्हणून, असे खरे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहेत याचा मला अभिमान आहे.
आज आपली मुंबई अक्षरशः लुटली जात आहे. सर्वकाही गुजरातला नेले जात आहे. माझा सर्व गुजरात्यांवर राग नाही. पण खास करून ते दोन जे तिकडे बसलेत, त्यांना कल्पना नाही महाराष्ट्र काय गोष्ट आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या काळात उघड्या गाडीत फिरत होते. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की, त्यांनी नेहरुंनाही महाराष्ट्रात बंद गाडीतून फिरावे लागले. कारण, महाराष्ट्र कुणाचीही मस्ती खपवून घेत नाही, असेही ते म्हणाले.
शहांनी आम्हाला शिकवू नये
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेणे कुणाला शोभते? 4 दिवसांपूर्वी अमित शहा रायगडावर येऊन गेले. त्यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका असे आवाहन केले. अहो, ते महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीतच. त्या काळात आजच्यासारखे व्हॉट्सएप, मोबाइल फोन किंवा गोदी मीडिया नव्हता. महाराजांच्या काळात सुरतेच्या लुटीची बातमी तेव्हा लंडनच्या गॅझेटमध्ये आली होती. त्यामुळे महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका असे सांगणारे तुम्ही कोण?





