Budget 2024 | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ‘पूर्वेकडील भागातील विकासासाठी सरकार औद्योगिक कॉरिडॉरला पाठिंबा देईल.’ या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. पूर्वेकडील एकूण ५ राज्यांच्या विकासावर भर देण्यात येईल
केंद्र बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पूर्वोदय’ योजना आणणार आहे. या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. या योजनेत बिहारसाठी अनेक भेटवस्तू आहे. अमृतसर-कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत गया येथे एक औद्योगिक केंद्र बांधले जाईल. सांस्कृतिक केंद्रे आधुनिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित केली जातील. या मॉडेलचे नाव असेल,’विकास भी विरासत भी.’
याशिवाय रस्त्यांची जोडणीही वाढवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर भागलपूर द्रुतगती मार्ग, बोधगया-राजगीर वैशाली दरभंगा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन पदरी पूलही बांधण्यात येणार आहे. यासाठी 26000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय काशीच्या धर्तीवर बिहारमधील गया येथे विष्णुपद मंदिर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पीरपेंटी येथे 21400 कोटी रुपये खर्चून 2400 मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट बांधण्यात येणार आहे. बिहारमध्ये नवीन विमानतळ आणि वैद्यकीय महाविद्यालयही बांधले जाणार आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी बिहारलाही मदत दिली जाईल.
आंध्र प्रदेशसाठीही सरकारने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.राज्यातील भांडवलाची गरज ओळखून केंद्र विविध एजन्सींच्या माध्यमातून राज्याला मदत करेल. या आर्थिक वर्षात यासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सरकार पोलावरम सिंचन प्रकल्पही पूर्ण करणार आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यांतर्गत, विशाखापट्टणम-चेन्नई औद्योगिक कॉरिडॉरमधील कोपर्थी क्षेत्र आणि हैदराबाद-बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरमधील ओरवाकल क्षेत्राच्या विकासासाठी निधी दिला जाईल.
रायलसीमा, प्रकाशम, नॉर्थ कोस्टल आंध्रसाठी निधी दिला जाईल.