Budget 2023: देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारे बजेट – खासदार बाळु धानोरकर

नवी दिल्ली – देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारे बजेट असून “मला पहा आणि फुले वाहा’ असा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, मजूरवर्ग, वाढती गरिबी याकडे र्दुलक्ष करण्यात आले आहे. गरीबी व बेरोजगारीमुळे महागाईचे चटके सर्वसामान्यांना जाणवत आहेत. प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट झाले पण कुणाचे? गरिबांचे की श्रीमंतांचे हे लक्षात घेतले पाहिजे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा अमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस खासदार बाळु धानोरकर यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊनच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात वर्षभरात या घोषणा किती पूर्ण होतात, हे सर्वांनाच माहिती आहे.
अर्थमंत्र्यांनी देशात 50 नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. मात्र, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूरचा विमानतळ अद्यापही पूर्ण झालेला नाही. केलेल्या घोषणा पूर्ण होत नसतील तर अशा अर्थसंकल्पाला काही अर्थ नाही, असेही धानोरकर म्हणाले.





