BSNL चा मोठा धमाका! फक्त 1 रुपयात मिळणार 4G, डेटा आणि कॉल्स अनलिमिटेड

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल आधुनिकीकरण करीत आहे. 4- जी सेवा देण्यासाठी या कंपनीने पूर्ण तयारी केली असून आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक महिन्याच्या वैधतेचा 4- जी सेवा प्लॅन केवळ एक रुपयाला उपलब्ध केला आहे.
भारतातील विविध शहरात कंपनीने या सेवा सुरू केल्या असून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी ही उपाययोजना केली असल्याचे समजले जाते. कंपनीने या प्लॅनला फ्रीडम प्लॅन असे नाव दिले आहे. आमच्या देशातील तंत्रज्ञानावर आधारित 4- जी सेवा ग्राहकांना अनुभवता याव्या याकरिता पुढाकार घेऊन आम्ही हा प्लॅन तयार केला असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे.
या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना अमर्याद कॉल करता येणार आहेत. प्रत्येक दिवसाला दोन जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध होणार आहे. तर दिवसाला शंभर एसएमएस करता येणार आहेत.
बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, आमचे तंत्रज्ञान आत्मनिर्भर भारत अंतर्गत पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. जगातील केवळ काही देशाकडेच हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांना या सेवांची ओळख व्हावी यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. त्यामुळे मोबाईल क्षेत्रातील आधुनिक सुविधा किफायतशीर दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
खासगी क्षेत्रातील जिओचा असा प्लान 349 रुपये, भारती एअरटेलचा 379 रुपये, वोडाफोनचा 399 रुपये या किमतीवर आहे. यामुळे इतर कंपन्यांचे ग्राहक बीएसएनएलकडे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एका वर्षात आपली उलाढाल 50 टक्क्यांनी वाढवण्याची सूचना केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलला केली आहे.





