BSNL ची स्वस्त 5G सेवा कधी सुरू होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

BSNL 5G Service Launch Soon: टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने देशातील अनेक शहरांमध्ये 5जी सेवा सुरू केली आहे. Vi ने देखील काही दिवसांपूर्वीच ठराविक शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. आता सरकारी कंपनी BSNL देखील लवकरच 5जी सेवा उपलब्ध करणार आहे. कंपनी सध्या देशातील विविध भागांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक 4जी मोबाइल टॉवर्स इंस्टॉल करत आहे. यासोबतच, 5जी सेवा उपलब्ध करण्यावर देखील कंपनीचा भर आहे. कंपनी कधीपर्यंत 5जी सेवा सुरू करेल याबाबत केंद्रीय मंत्री मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माहिती दिली आहे.
कधी सुरू होणार BSNL ची 5G सेवा?
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माहिती दिली की, ‘मे-जून 2025 पर्यंत कंपनीचे 4जी टॉवर्स इंस्टॉल करण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित 5जी सेवेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर काम सुरू केले जाईल.’ सध्या कंपनी काही ठराविक भागांमध्ये 5जी सेवेच्या टेस्टिंगचे काम करत आहे. त्यामुळे बीसएनएल लवकरात लवकर 5जी नेटवर्क देशभरात सुरू करण्याची शक्यता आहे.
4G साठी भारतीय उपकरणांचा वापर
बीएसएलएने 4जी सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वदेशी उपकरणांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माहिती दिली की, बीएसएनएलने C-DoT सोबत मिळून कोर 4जी सिस्टम तयार केली आहे. याशिवाय, तेजस नेटवर्क आरएएन आणि क्यू बीटीएससोबत देखील काम केले आहे. BSNL 4जी आणि 5जी दोन्ही सेवांसाठी ‘मेड इन इंडिया’ उपकरणांचा वापर करणार आहे.
दरम्यान, याआधी BSNL द्वारे मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2024 मध्ये देखील 5जी सेवेबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे पुढील दीड ते दोन वर्षांमध्ये कंपनी देशभरात स्वस्त 5जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.





