Jammu Kashmir : निवडणूक ड्युटीवर जाणाऱ्या BSF टीमच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) बसला अपघात झाला. या अपघातात तीन जवान शहीद झाले, तर 32 जवान जखमी झाले. यातील सहा जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना खानसाहेब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी सैनिकांसह बडगामला जात असताना हा अपघात झाला.
जी/124 बीएसएफची 01 कंपनी पीएस-खानसाहेब येथील वॉटरहॉल पोलिस चौकीत निवडणूक ड्युटीसाठी जात होती. संध्याकाळी 5 च्या सुमारास बीएसएफ जवानांना घेऊन पुलवामाहून बडगामला जाणारी बस त्यांच्या पोलीस चौकी वॉटरहॉलच्या अवघ्या 600 मीटर आधी एका खड्ड्यात पडली. सीआरपीएफ, बीएसएफ, नागरी पोलीस आणि नागरिकांनी जखमी सैनिक आणि बस चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. खड्ड्यात पडल्याने बसचा चक्काचूर झाला असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या बीएसएफ जवानांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत. अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.
Budgam, J&K: A major accident occurred in Budgam, where a bus carrying BSF personnel plunged into a deep gorge. Rescue operations are currently underway, and medical teams have been dispatched to provide urgent care to the injured. Authorities are investigating the cause of the… pic.twitter.com/4A4Cyj3UFI
— IANS (@ians_india) September 20, 2024
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका –
जम्मू-काश्मीरमधील 90 जागांवर तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. जम्मू विभागातील 3 आणि काश्मीर खोऱ्यातील 4 जिल्ह्यांतील एकूण 24 जागांवर मतदान झाले आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 90 अपक्षांसह 219 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 23 लाख मतदारांची नावे मतदार यादीत होती. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तब्बल 10 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत.





