बीआरएस कधीच भाजपची बी टीम बनणार नाही; केसीआर यांच्या पुत्राची ग्वाही

हैदराबाद – भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) भाजपशी कुठलाही समझोता झालेला नाही. बीआरएस कधीच भाजपची बी टीम बनणार नाही, अशी ग्वाही बीआरएसचे कार्याध्यक्ष के.टी.रामा राव यांनी शुक्रवारी दिली. ते तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे पुत्र आहेत.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यावरून केसीआर यांच्या कन्या के.कविता ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, भाजपशी समझोता झाला असल्याने कविता यांना अटक झाली नसल्याचा दावा तेलंगणातील सत्तारूढ कॉंग्रेसकडून केला जात आहे. तो दावा केटीआर यांनी फेटाळून लावला.
बीआरएस आणि भाजपमध्ये कुठला समझोता असल्याने नव्हे; तर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे कविता यांना दिलासा मिळाला. बीआरएस आणि भाजपमध्ये समझोता असता; तर कविता यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असता का?
आमची याआधी भाजपशी युती नव्हती आणि यापुढेही नसेल. बीआरएस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. तर, भाजप हा राजकीय हिंदूंचा पक्ष आहे, अशी भूमिका त्यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना मांडली.





