Manoj Tiwary : ब्रोंको टेस्ट म्हणजे रोहितला संघातून बाहेर काढण्याचा डाव? मनोज तिवारीचा खळबळजनक दावा!

Manoj Tiwary Claims Bronco Test Targets Rohit Sharma’s Ouster : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला वनडे संघातून बाहेर काढण्यासाठी नवीन ब्रोंको चाचणी आणली गेली असल्याचा खळबळजनक दावा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने केला आहे. क्रिकट्रॅकरशी बोलताना तिवारीने सांगितले की, ही चाचणी रोहित शर्माला लक्ष्य करून आणली गेली आहे, कारण कोणीतरी त्याला 2027 च्या विश्वचषक योजनेतून बाहेर ठेवू इच्छित आहे.
ब्रोंको चाचणी खास रोहितसारख्या खेळाडूंसाठी –
मनोज तिवारी म्हणाला, “भारतीय क्रिकेटमधील घडामोडी मी बारकाईने पाहतो. मला वाटतं, ही ब्रोंको चाचणी खास रोहितसारख्या खेळाडूंसाठी आहे. कोणाला तरी रोहित संघात नको आहे.” सामान्यतः रग्बी खेळाडूंमध्ये प्रचलित असलेली ही चाचणी भारतीय संघासाठी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच एड्रिय ले रॉक्स यांच्या देखरेखीखाली लागू करण्यात आली आहे.
ब्रोंको चाचणीच्या वेळेवर प्रश्न उपस्थित –
आता खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी यो-यो चाचणी, 2 किमी धाव आणि ब्रोंको चाचणी अशा तिन्ही चाचण्या उत्तीर्ण कराव्या लागतील. मनोज तिवारीने ब्रोंको चाचणीच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले. “नवीन मुख्य प्रशिक्षक आल्यानंतर आणि पहिल्या मालिकेच्या जबाबदारीनंतर ही चाचणी का लागू केली? यामागील हेतू काय? याचा विचार कोणी केला?” असे तिवारीने विचारले. तिवारीच्या मते, रोहित शर्मा फिटनेसवर जास्त मेहनत घेत नाही आणि या चाचणीमुळे त्याला संघातून बाहेर ठेवण्याचा डाव असू शकतो.
हेही वाचा – Lalit Modi : हरभजनने श्रीसंतला मारली होती चापट! 18 वर्षांनंतर पुन्हा VIDEO व्हायरल, नेमकं कारण काय?
रोहितबाबत काहीतरी योजनाबद्ध चाललंय –
भारतीय संघ सध्या 2027 च्या विश्वचषकापूर्वी बदलाच्या टप्प्यातून जात आहे. तिवारीने म्हणाला, “विराट कोहलीला विश्वचषक योजनेतून बाहेर काढणे कठीण आहे, पण रोहितबाबत काहीतरी योजनाबद्ध चाललंय असं वाटतं.” या दाव्याने भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – Danish Malewar : कोण आहे दानिश मालेवार? ज्याने दुलीप ट्रॉफीत द्विशतक झळकावत रचला इतिहास
नक्की काय आहे ब्रोंको चाचणी?
ब्रोंको चाचणी ही परंपरेने रग्बी खेळात वापरली जाते. यामध्ये खेळाडूला प्रथम 20 मीटर शटल धाव पूर्ण करावी लागते, त्यानंतर 40 मीटर आणि 60 मीटर धावावे लागते. या तिन्ही धावांचा एक संच तयार होतो आणि खेळाडूला न थांबता असे 5 संच पूर्ण करावे लागतात. यासाठी 6 मिनिटांची वेळमर्यादा आहे, ज्यामध्ये खेळाडूला एकूण सुमारे 1200 मीटर धावावे लागते. ही चाचणी बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स येथे सुरू झाली असून, काही वरिष्ठ खेळाडूंनी येथे ही चाचणी दिली आहे.





