Pimpri : बीआरटी मार्गातील प्रवासाला तुटलेल्या बॅरिकेट्सचा अडथळा

पिंपळे गुरव : दापोडी ते निगडी प्रवासादरम्यान चिंचवड, आकुर्डी, पिंपरी, खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी या बीआरटी मार्गावर जागोजागी अपघात होऊन बॅरिकेट्स तुटून पडलेले दिसत आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशांकडून लवकरात लवकर बॅरिकेट्सची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
वाहतूक नियोजनासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, या वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिक फाटा मेट्रो रेल्वे स्टेशन येथे बीआरटी मार्गावर काही दिवसांपासून बेरिकेट्स तुटून गेल्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून बॅरिकेट्सचा तुटले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. तरीही प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही.
– संजय कणसे,
सामाजिक कार्यकर्ते
निगडी ते दापोडीपर्यंत बीआरटी मार्गावर तुटलेले बॅरिकेट दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत. मात्र, ते आता तुटून गेल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
महामार्गावरील याठिकाणच्या बॅरिकेट्स तुटल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यावर कार्यवाही करून, याठिकाणच्या बॅरिकेट्स दुरुस्त केले जातील.
– संतोष कुदळे,
कनिष्ठ अभियंता, बीआरटीआर मार्ग _





