T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये ब्रॉडकास्टरला मोठा तोटा, आयसीसीकडे केली ‘ही’ मागणी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Broadcaster & ICC T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी अजिबात चांगला नव्हता. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, डिस्ने स्टारला काही वर्षांपूर्वी स्वाक्षरी केलेल्या आयसीसी (ICC) सोबत मोठ्या प्रसारण करारावर पुन्हा चर्चा करायची आहे.
आयसीसी आणि स्टार यांच्यातील 3 अब्ज डॉलरचा करार अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपासून लागू झाला. आता ‘क्रिकबझ’ मधील एका अहवालात असे म्हटले आहे की, ब्रॉडकास्टर अनेक कारणांमुळे विश्वचषक स्पर्धेच्या एकूण मूल्यांकनावर सूट देण्याची मागणी करत आहे.
अहवालानुसार, स्टारने आयसीसीला दोन पत्रे लिहिली आणि गेल्या महिन्यात कोलंबो येथे झालेल्या वार्षिक परिषदेत या मुद्द्यावर चर्चा झाली. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, अंतिम निर्णय बोर्डावर अवलंबून असेल.
830 कोटींची सूट देण्याची केली मागणी…
टी-20 विश्वचषक 2024 च्या ब्रॉडकास्टरने टूर्नामेंट दरम्यान झालेल्या नुकसानासाठी आयसीसी कडून सुमारे 830 कोटी रुपये माफ करण्याची मागणी केली. विविध कारणांमुळे स्टार वर्ल्ड कपमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 830 कोटी रुपये) पेक्षा जास्त डिस्काउंटची मागणी करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही सूट देण्याची मागणी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे फ्लोरिडा येथे पावसामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील रद्द झालेला सामना असल्याचे सांगितले जात आहे. या स्पर्धेत भारताच्या सामन्यांना जास्त मूल्य होते.
WI vs SA 2nd T20 : द. आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये वेस्टइंडिज 30 धावांनी विजयी….
भारत-कॅनडा व्यतिरिक्त, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध नेपाळ यासारखे काही सामने देखील रद्द करण्यात आले. तथापि, ब्रॉडकास्ट डीलमध्ये सामान्यत: परतावा खंड समाविष्ट नसतो. त्यामुळे आता स्टार आयसीसीला कितपत पटवून देण्यात यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतकेच नाही तर स्टारने अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लो स्कोअरिंग सेमीफायनलवरही चिंता व्यक्त केली, जिथे अफगाणिस्तान 56 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यानंतर आफ्रिकेने केवळ 9 षटकांत लक्ष्य गाठून विजय मिळवला.





