नाताळच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये संप; पंतप्रधान ऋषी सुनक यांनी घेतला मोठा निर्णय

लंडन ( britain workers call for strike ) – ब्रिटनमध्ये नाताळच्या पार्श्वभूमीवर संप पुकारणाऱ्या कामगारांवर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बळाचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. संप करणाऱ्या कामगारांमुळे महत्वाच्या सेवा खंडित होऊ नयेत म्हणून सुनक यांनी 1,200 पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
ब्रिटनमध्ये सध्या थंडीची लाट आली आहे. यातच रेल्वे, आरोग्य कर्मचारी, सीमा सुरक्षा दल आदी महत्वाच्या सेवांशी संबंधित कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना वाढीव वेतनाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. हे प्रस्ताव योग्य स्वरुपाचे आहेत.
मात्र तरिही कामगार संघटना आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. या संपकरी कामगारांवर कारवाईची वेळ आली आहे, असे सुनक यांनी एका दैनिकात लिहीलेल्या लेखामध्ये म्हटले आहे. प्रामुख्याने नाताळच्या पार्श्वभुमीवर जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे वेळ पडली तर बळाचा वापर करावा लागेल, असेही सुनक यांनी म्हटले आहे.
ब्रिटनमधील आर्थिक स्थितीचा विचार करूनच कामगारांना वाढीव वेतनाचा प्रस्ताव दिला गेला आहे. कामगारांनी याचा विचार करायला हवा होता, असेही सुनक यांनी म्हटले आहे.





