‘100 घेऊन या आणि सरकार बनवा’; भाजपमधील अंतर्गत वादानंतर अखिलेश यादव यांची मान्सून ऑफर

Akhilesh Yadav | लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश मिळाले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला याचा मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमने-सामने आल्याचे दिसत आहे. यानंतर उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, त्यासंदर्भात लखनौपासून दिल्लीपर्यंत बैठका सुरू आहेत. भाजपमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मान्सून ऑफर दिली आहे.
अखिलेश यादव यांनी ट्वीट करत ‘100 आणा, सरकार बनवा!’ अशी थेट ऑफरच भाजपला दिली आहे. याचा अर्थ 100 आमदारांना सोबत घेऊन या आणि समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशात सरकार बनवा, असे सूचक आवाहन या माध्यमातून अखिलेख यादव यांनी केले आहे.
अखिलेश यादव यांनी ही ऑफर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना उद्देशून दिल्याचे बोलले जात आहे. सध्या भाजपमधील अंतर्गत वाद समोर येत असताना अखिलेश यादव यांनी दिलेली ऑफर चर्चेचा विषय ठरत आहे.अखिलेश यादव यांनी केशव प्रसाद मौर्य यांना पहिल्यांदाच ऑफर दिली असे नाही. ‘Akhilesh Yadav |
मानसून ऑफ़र: सौ लाओ, सरकार बनाओ!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 18, 2024
भाजपमधील अंतर्गत वादाच्या बातम्या आल्यावर अखिलेश यादव म्हणाले होते की, ‘भाजपच्या खुर्चीसाठीच्या लढाईच्या वातावरणात यूपीमधील प्रशासनाची फरफट झाली आहे. जे तोडफोडीचे राजकारण भाजप इतर पक्षांत करत असे, तेच काम आता आपल्या पक्षांतर्गत करत आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत वादाच्या दलदलीत बुडाला आहे. जनतेचा विचार करणारा भाजपमध्ये कोणी नाही.’
अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले होते की, देशात आणि राज्यात भाजपची मजबूत संघटना आणि सरकार आहे. SP चा PDA ही फसवणूक आहे. यूपीमध्ये सपाचे गुंडराज परत येणे अशक्य असून 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 2017 ची पुनरावृत्ती करेल, असा दावा त्यांनी केला होता. Akhilesh Yadav |
नुकतीच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. ज्यामध्ये भाजप नेत्यांमधील मतभेद समोर आले होते, उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी सरकारपेक्षा संघटना मोठी असल्याचे म्हटले होते. कार्यकर्त्यांचे दुःख हे माझे दुःख आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकसभेच्या निवडणुकीत अतिआत्मविश्वासामुळे भाजपचे नुकसान झाल्याचे म्हणाले.
दरम्यान, भाजपचे लक्ष आता यूपीतील 10 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे आहे. त्यासाठी पक्ष तयारीत व्यस्त आहे. यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी ज्या कॅबिनेट मंत्र्यांना या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांची बैठक बोलावली होती.
हेही वाचा:
‘…तर राजकीय नेते पाणीपुरी विकणार काय?’ शंकराचार्यांच्या वक्तव्यावर कंगना संतापली





