Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेला महिला कुस्तीपटूंचे आव्हान
Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात चार महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. ट्रायल कोर्टाच्या निरीक्षणांवरही आक्षेप घेण्यात आला आहे.

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना यौन उत्पीड़न प्रकरणात निर्दोष मुक्त केल्याच्या निर्णयाला चार महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात नसून राऊज अॅव्हेन्यू न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या अपिलावर २६ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
३ ऑगस्ट २०२६ रोजी राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन सहायक सचिव विनोद तोमर यांना आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. सहा महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवरील खटल्यात पुरावे संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.
न्यायालयाच्या निरीक्षणांवर कुस्तीपटूंचा आक्षेप –
महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या अपिलात खालच्या न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने टिकणारा नसल्याचा दावा केला आहे. तसेच पुराव्यांचे निवडक पद्धतीने मूल्यांकन करण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
#BREAKING Women wrestlers move Delhi Court challenging acquittal of BJP leader Brij Bhushan Saran Singh in sexual harassment case.
They argue that the order is “archaic” and based on stereotypical assumptions about the “expected” behaviour of sexual assault victims. https://t.co/MX5THtYowQ
— Live Law (@LiveLawIndia) September 25, 2026
याचिकेत लैंगिक छळाच्या पीडितेने घटनेनंतर कसे वागावे, याबाबत ठरावीक अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. पीडितेने आरोपीसोबत नंतरही संपर्क ठेवला किंवा काही काळ तक्रार केली नाही, यावरून तिच्या आरोपांची विश्वासार्हता ठरवता येत नाही, असा युक्तिवाद कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांनी खालच्या न्यायालयाच्या काही निरीक्षणांना ‘जुनाट आणि रूढ कल्पनांवर आधारित’ असल्याचे म्हटले आहे.
ट्रायल कोर्टाने तक्रारदारांच्या जबाबांमधील काही विसंगती, तक्रारीसाठी झालेला विलंब आणि बृजभूषण सिंह यांच्याशी कथितपणे दीर्घकाळ सामान्य संबंध राहिल्याच्या मुद्द्यांचा विचार केला होता. काही तक्रारदारांनी त्यांना कौटुंबिक कार्यक्रमांनाही बोलावल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले होते.
महिला कुस्तीपटूंच्या अपिलात मात्र अशा परिस्थितींकडे पीडितेच्या वर्तनाच्या ठरावीक चौकटीतून पाहता येणार नाही, असे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असू शकते आणि लैंगिक छळानंतर प्रत्येक पीडितेची प्रतिक्रिया एकसारखी असेलच असे नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप सातत्याने फेटाळले आहेत. आता सत्र न्यायालय या अपिलावर सुनावणी करून ट्रायल कोर्टाच्या निर्णयाचा कायदेशीर आढावा घेणार आहे.





