हेगडे, जाधव यांना ‘ब्रिज इंजिनिअर’ पुरस्कार

पुणे -सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (सीओइपी टेक) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे पूल बांधकाम तज्ज्ञ एस. बी.जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापत्य शास्त्रातील रचना व उत्कृष्ट पूल बांधणीसाठीचा पुरस्कार “एसटीयुपी’चे माजी कार्यकारी संचालक व्ही. एन. हेगडे यांना देण्यात आला. तसेच डॉ. सी. व्ही. कांड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्ट्रक्टकॉन डिझाइन्सच्या सिनिअर डिझाइन व्यवस्थापर मनीषा जाधव यांना पुरस्कार देण्यात आला.
सीओईपी टेक माजी विद्यार्थी संघटना आणि (सीओईपी टेक) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. सुजित परदेशी, संयोजक प्रा. बी. एम. डवरी, व्ही. एन.शिंदे, अविनाश जोशी, सुहासिनी माढेकर, सुनील कांड यांच्यासह अनेक आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
व्ही. एन. हेगडे यांनी दिल्ली येथील नमस्ते ब्रिज, विविध नद्यांवरील पूल, फ्लायओव्हर या विषयी डिझाइन, काळजीपूर्वक नियोजन व अंमलबजावणीतील तंत्रज्ञान बांधकामातील आव्हाने आणि त्यावरील उपाय या विषयी तपशीलवार माहिती दिली.
मनीषा जाधव यांनी ठाणे येथील कापूरवाडी येथील उड्डाणपुलाचे जंक्शन, ठाणे आणि कळवामधील खाडीवरील पूल, केरळमधील कोलम बाय पास ब्रिज, के. एस. बी. चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरमधील डिझाइनमध्ये नवीन कल्पना अमलात आणून पूर्तता केलेल्या प्रकल्पाविषयी माहिती सांगितली.





