BRICS : इंडोनेशिया बनला ब्रिक्स गटाचा अधिकृत सदस्य

साओ पावलो (ब्राझील) : ब्रिक्स या विकसनशील देशांच्या गटामध्ये इंडोनेशिया हा नवीन सदस्य म्हणून सहभागी झाला आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद असलेल्या ब्राझीलने ही माहिती जाहीर केली आहे. इंडोनेशियाला ब्रिक्सचे सदस्यत्व देण्यात यावे, या मागणीला ब्रिक्सच्या सदस्य देशांनी ऑगस्ट २०२३ मध्येच सकारात्मक प्रतिसाद दिला होता, असेही ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मात्र इंडोनेशियामध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच इंडोनेशियाला ब्रिक्स गटाचा अधिकृत सदस्य म्हणून मान्यता मिळू शकली.ब्राझीलने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून ब्रिक्स गटात प्रवेश मिळाल्याबद्दल इंडोनेशियाचे स्वागत केले आहे. इंडोनेशिया हा दक्षिण आशियामधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आणि मोठी अर्थसत्ता असलेला देश आहे.
जागतिक प्रशासनातील सुधारणासाठी कटिबद्ध असलेल्या अन्य विकसनशील देसांच्या पंक्तीत आता इंडोनेशियाही जाऊन बसला आहे. जागतिक दृष्ट्या महत्वाच्या मुद्यांवरील इंडोनेशियाची भूमिकाही महत्वाची आहे, हेच ब्रिक्समधील प्रवेशामुळे सिद्ध झाले आहे. समानता, परस्पर आदर आणि शाश्वत विकास अपेक्षित असलेल्या अन्य विकसनशील देशांबरोबरच्या सहकार्य आणि निकटचे संबंध प्रस्थापित करण्यासाठीच इंडोनेशिया ब्रिक्समध्ये सहभागी झाला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे.
सदस्य संख्या वाढली…
ब्रिक्सची स्थापना ब्राझील, रशिया, भारत आणि चीनने मिळून २००९ साली केली. तर या गटामध्ये २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकाही सामील झाला. गेल्यावर्षीच इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीदेखील या गटात सामील झाले. तर सौदी अरेबिलालाही या गटात सामील होण्याचे निमंत्रण दिले गेले आहे. मात्र सौदीकडून अद्याप हे निमंत्रण स्वीकारले नाही. तुर्कस्तान, अझरबैजान आणि मलेशियाने सदस्य होण्यासाठी औपचारिकपणे अर्ज केला आहे आणि इतर काहींनी स्वारस्य व्यक्त केले आहे.





