पुणे – लाच प्रकरणात पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी जामीन दिला आहे. होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाच जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. लांडगेसह त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया अशी त्या जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. लांडगे यांच्यावतीने ऍड. प्रताप परदेशी आणि ऍड. गोरक्षनाथ काळे यांनी तर उर्वरित आरोपींतर्फे ऍड. विपुल दुशिंग, ऍड. किर्तीकुमार गुजर, ऍड. संजय दळवी यांनी काम पाहिले. पहिल्या व तिसऱ्या सोमवारी एसीबीच्या कार्यालयत हजेरी लावणे. साक्षीदारांशी संपर्क साधायचा नाही. तपासात ढवळाढवळ करायची नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करायचे, अशा अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे