लाच प्रकरण: आम आदमी पार्टीच्या आरोग्यमंत्र्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Updated On:

चंदीगड – पंजाब मधील आम आदमी पक्षाच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच मंत्र्याच्या विरोधात तडकाफडकी ही कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आणि त्यांना त्याच दिवशी अटकही केली होती. त्यामुळे संपुर्ण देशभर खळबळ माजली होती.
सिंगल यांना सुरूवातीला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी त्यांची चौदा दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सिंगला यांनी सरकारी कंत्राटे मंजुर करताना संबंधीत कंत्राटदाराकडे एक टक्का लाचेची मागणी केली होती. ही बाब मुख्यमंत्री मान यांच्या निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी तडकाफडकी ही कारवाई केली आहे.





