Breaking News : आता अहिल्यानगर ! अहमदनगरच्या नामांतरास केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली मंजुरी

Ahmednagar Now Ahilyaanagar – विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. दुसरीकडे केंद्र सराकारने देखील आणखी एक मोठा निर्णय घेत अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केल्यानंतर आज घेतलेल्या या निर्णयामुळे सत्ताधारी महायुतीला निवडणूकीत फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. यादरम्यान या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी देत राज्य सरकारने केंद्र सरकारकउे पाठविला होता. या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. अहिल्यानगर नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी असल्यामुळे अहिल्यानगर होणार का नाही? याबाबत संभ्रम अवस्था असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नाव बदलू नये, म्हणून याचिका दाखल केली होती.
मात्र आता केंद्र सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यास मंजुरी दिल्याने ही चर्चा थांबणार आहे. दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत या निर्णयाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या आभार मानले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला होता. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची घोषणा केली होती.





