ब्राझिलिया :- ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल करण्यात नेमारने माजी दिग्गज फुटबॉलपटू पेलेंला मागे टाकले आहे. बोलिव्हियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात नेमारने ही कामगिरी केली.
बोलिव्हियाविरुद्धच्या सामन्यात 31 वर्षीय नेमारने ब्राझीलसाठी 78 वा गोल केला, ज्यासह त्याने महान पेलेचा विक्रम मोडला. बोलिव्हियाविरुद्धच्या सामन्यात नेमारने 61व्या मिनिटाला ऐतिहासिक गोल केला, जो ब्राझीलसाठी सामन्यातील चौथा गोल ठरला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला नेमारची पेनल्टी हुकली, ती बोलिव्हियाचा गोलरक्षक बिली विस्कारा याने वाचवली. अन्यथा पेलेंचा विक्रमाला नेमारने आधीच पाठ दाखविली असती.
ब्राझीलसाठी, आतापर्यंत फक्त नेमार जूनियर आणि महान पेले यांनीच 70 गोलचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. आता नेमारने पेलेंचा विक्रमाला मागे टाकूण इतिहासिक कामगिरी केली आहे. पेले यांचे गेल्यावर्षी 29 डिसेंबर रोजी वयाच्या 82 व्या वर्षी “साओ पाउलो’ येथे कर्करोगाने निधन झाले आहे.
दुखापतीतून परतल्यानंतर नेमारने हे मोठे यश संपादन केले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत नेमार ब्राझीलकडून खेळताना दिसला होता.
बोलिव्हियावर 5-1 अशी मात
ब्राझील आणि बोलिव्हिया यांच्यात झालेल्या 2026 विश्वकरंडक पात्रता फेरीच्या सलामीच्या सामन्यात ब्राझीलने 5-1 ने विजय मिळवला आहे. या सामन्यात नेमारने 2 गोल केले. आता त्याच्या नावावर 79 आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले गेले आहेत. याशिवाय त्याने सामन्यात एक असिस्टही केला. नेमारच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर फुटजबॉल विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.