साओ पावलो (ब्राझील) – ब्राझीलमध्ये एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा शनिवारपासून थांबवली गेली. त्यामुळे देशभरात कोठूनही एक्सचा वापर केला जाऊ शकत नव्हते. ब्राझीलमध्ये कायदेशीर प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली, तरी एक्सने कायदेशीर प्रतिनिधीची नियुक्ती न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ब्राझीलमधील दूरसंचार नियामक एन्टाटेलने शनिवारी मध्यरात्रीपर्यंत देशभरातील एक्स वापरकर्त्यसाठीची सेवा खंडीत करण्याचे आदेश इंटरनेट सेवा प्रदात्यांना दिले आहेत. एक्सचे मालक एलॉन मस्क आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोराएस यांच्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कडव्या उजव्या विचारांची अकाऊंट आणि चुकीच्या माहीतीच्या मुद्यावरून काही महिन्यांपासून सुरू असलेला तणाव या कारवाईमुळे अधिकच वाढला आहे. ब्राझीलमध्ये कायदा प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही, तर ब्राझीलमध्ये एक्सची सेवा थांबवली जाईल, असा इशारा डी मोरेयास यांनी मस्क यांना बुधवारी दिला होता. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी २४ तासांची मुदतही देण्यात आली होती. एक्सने या महिन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलमध्ये कायदा प्रतिनिधी नियुक्त केलेला नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. एलॉन मस्क यांना ब्राझीलच्या सार्वभौमत्वाविषयी काहीही आदर नाही. विशेषतः ब्राझीलच्या न्याय व्यवस्थेबद्दल त्यांना अजिबातच आदर नाही. ते स्वतःला इतरांपेक्षा असामान्य आणि प्रत्येक देशातील कायद्याला बांधील नसलेली व्यक्ती समजतात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी मोराएस यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.