पुणे जिल्हा | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर विचारमंथन

माळेगाव, (वार्ताहर) – माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशनच या महाविद्यालयाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण (AAA) पार पडले.
ऑडिट कमिटीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य तसेच मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरचे प्राचार्य डॉ. देविदास वायदांडे यांनी अध्यक्ष म्हणून तसेच तुळजाराम चतुरचंद कॉलेज कॉमर्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉ. जनार्दन पवार, माळेगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर पिसाळ यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.
डॉ. वायदांडे यांनी राष्ट्रीय मूल्यांकन संस्था (नॅक) यांनी जे बेंच मार्क घालून दिलेले आहेत. त्या तुलनेत गुणवत्ता सुनिश्चित करण्यास शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण (AAA) मदत करते. शैक्षणिक वर्ष २०२४ पासून लागू केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
यासाठी लागणारे आवश्यक ते बदल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केल्याचे त्यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात लवचिकता असल्याने विद्यार्थ्यांना विविध विषय घेऊन पुढे जाण्याचा मार्ग सोपा केला आहे. यासाठी प्राध्यापकांनीही नवीन नवीन टेक्नॉलॉजी तसेच प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे, डॉ. मंगेश फुटाणे, समन्वयक प्रा. सोनाली बंडगर, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी ऑडिटचे काम यशस्वीरित्या पार पाडले.
संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव जगताप, विश्वस्त अनिल जगताप, रवींद्र थोरात, रामदास आटोळे, वसंत तावरे, महेंद्र तावरे, गणपत देवकाते, चैत्राली गावडे, सीमा जाधव, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे प्राचार्य, डॉ. अजित चांदगुडे यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. डॉ. दीपाली जाधव यांनी आभार मानले.





