फलटण – तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या संशयितास फलटण शहर पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या सहा तासांत तपास करत अटक केली. फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 17 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास येथील शिवाजीनगरमधील श्री सिध्दीनाथ गणेश तरुण मंडळ येथून अजित पोपट बुरुंगले (वय 24, रा. नगरपरिषद शाळा क्रमांक 7 च्यापाठीमागे शिवाजीनगर, फलटण) हा घरात कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेला आहे तो अद्यापपर्यत परत आला नाही, अशी बेपत्ता झाल्याची तक्रार पोपट आप्पा बुरुंगले यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्याप्रमाणे बेपत्ता नोंद दि. 18 रोजी दाखल झाली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी मपोना बोबडे यांच्याकडे तपास दिला होता. तो तपास करत असताना दि. 19 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीमध्ये दाखल बेपत्ता वर्णनाचे एक अनोळखी बेवारस मृतदेह आढळला होता. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेपत्ताचे वर्णन व मृतदेहाचे वर्णन व कपडे यांचे साधर्म्य असल्याने पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची खास नियुक्ती करुन बेपत्ता व्यक्तीचे “सीडीआर’चे तांत्रीक विश्लेषण तसेच बेपत्ता व्यक्तीच्या पत्नीकडे कौशल्यपूर्ण तपास करुन मृत अजित यांची पत्नी हिचे संशयित करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, संस्कृती हॉटेलमागे, केसनंद, पुणे) यांचे प्रेमसंबध होते. या प्रेमसंबधास व लग्न करण्यासाठी तिच्या पतीचा अडथळा येत असल्याने संशयिताने त्याचा साथीदार राहुल उत्तम इंगोले (वय 22, रा. लोहमार्ग रोड बालाजी ट्रेडर्सचे समोर, वाघोली, पुणे) याच्या मदतीने अजित बुरुंगले यांस फलटण येथे घरातून बाहेर फोन करुन बोलावून घेतले. साथीदाराच्या मदतीने अजित बुरुगले यांचा दोरीने गळा आवळून त्यानंतर त्यांचे हातपाय दोरीने बांधून पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने नीरा उजवा कॅनॉलमध्ये टाकून देऊन त्यांचा खून केला, अशी कबुली संशयित करण विठ्ठल भोसले याने दिली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित करण भोसले यास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील शेळके तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक राहुल धस, सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज शिंदे, हवालदार वाडकर, धापते, जगताप, पाटोळे, कर्णे, खराडे, बोबडे, वाघ, करपे यांनी ही कारवाई केली.