दोन्ही शिवसेनेने ठरविले जिल्हाप्रमुख ? माजी आमदार ऍड.चाबुकस्वार, बाळासाहेब वाल्हेकर यांच्या नावाची चर्चा

पिंपरी, दि. 23 (प्रदीप लोखंडे) -शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नवीन नियुक्त्या लवकरच जाहीर होणार आहेत. सुरूवातीला पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हा प्रमुखपदाची निवड होणार आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटातून बाळासाहेब वाल्हेकर तर उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांची वर्णी लागणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या बाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतून शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. भाजपासोबत युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. पिंपरी-चिंचवड शहरातून खासदार श्रीरंग बारणे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. तर माजी आमदार ऍड. चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत.
सध्या पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हाप्रमुखपद निवड जाहीर करण्यासाठी दोन्ही गटातून हालचाली सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांचे नाव आघाडीवर आहे. पिंपरी विधानसभेतून गत विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. पाली भाषेतून विधानसभा सदस्याची शपथ घेणारे राज्यातील ते पहिले आमदार होते. त्यांचीच या पदावर वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून बाळासाहेब वाल्हेकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब वाल्हेकर हे पूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी होते.
शिंदे गटाचा महाराष्ट्रातील पहिला जिल्हाप्रमुख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून जिल्हाप्रमूखपदी नियुक्त्या करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पिंपरी, चिंचवड आणि मावळ मधून महाराष्ट्रातील पहिला जिल्हा प्रमुख निवडला जाणार असल्याची चर्चा आहे. पुढच्या आठवड्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
16 आमदारांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे घेणार निर्णय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही जिल्हा प्रमुखपद निवडले जाणार आहे. मात्र 16 आमदारांबाबत न्यायालयाच्या निकालाकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. हा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत नावाची घोषणा होईल, असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.जाणार असल्याची चर्चा आहे. पुढच्या आठवड्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे.





