मोठी राजकीय उलथापालथ, पाचपुतेंच्या विरोधातले दोन्ही मोठे नेते राष्ट्रवादीत ! नगरचे राजकारण फिरणार?

श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उपस्थितीत यांच्या बुधवारी मुंबई कार्यकर्त्यांच्या समवेत प्रवेश केला. या दोघांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे.
या दोन्ही नेत्यांची तालुक्यात सहमती एक्सप्रेस धावणार असल्याने आमदार विक्रम पाचपुते यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. सत्तेमध्ये वाटेकरी वाढल्याने राजकीय स्पर्धा देखील तेवढीच जोमाने होण्याची चिन्हे आहेत.
जगताप व नागवडे यांच्या पक्ष प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली असून तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणाची दिशाही आता बदली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जगताप व नागवडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश रखडला होता. अर्थात पाचपुते यांनी तो होणार नाही असा प्रयत्न केला होता. परंतू तालुक्यातील बहुतांशी नेत्यांचा कल हा अजितदादाच्या पक्षाकडे असल्याने व पक्ष संघटना वाढीसाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न होत असल्याने आ. पाचपुतेंचे प्रयत्न निष्फळ ठरले.
महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार पक्ष प्रवेश होत आहे. यापूर्वी काँग्रेस नेते घनश्याम शेलार तसेच मंत्री विखे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करणारे माजी आमदार राहुल जगताप आणि उद्धव सेनेला रामराम करत राजेंद्र नागवडे यांनी दोन्ही नेत्यांनी अचानक एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
तालुक्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्याबरोबर अन्य नेते ही राष्ट्रवादीत आल्याने सध्या तरी भाजपचे आ. पाचपुते हे एकाकी पडले आहेत. महायुती म्हणून सध्या तरी तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर नागवडे जगताप हे राजकीय वैर विसरून एकत्र आल्याने तालुक्यात आता पुन्हा पाचपुते विरोधी नेत्यांची मोट बांधली जाणार आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, अशोक सावंत, भगवान पाचपुते उपस्थित होते.
तालुक्यात काँग्रेस पुन्हा पोरका
काँग्रेस पक्षातील नेत्यांसह पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्ष पुन्हा पोरका झाला आहे. काँग्रेसने अनेक वेळा स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा पुन्हा पक्षात घेत पावन करून घेतल्याने काँग्रेसवर ही वेळ आली असून काँग्रेसने तालुक्यात आता आ. ओगले सारख्या इतर सामान्य कार्यकर्त्यांना तालुक्यात संधी दिल्यास ही पोकळी नक्कीच भरून निघू शकते.
अजित ‘दादा’च अनुपस्थित
घनशाम शेलार आणि अण्णासाहेब शेलार यांच्या पक्षप्रवेशावेळी स्वतः उपमुख्यमंत्री अजित ‘दादा’ पवार उपस्थित राहिले पण राहुल ‘दादा’ जगताप आणि राजू ‘दादा’ नागवडे यांना मात्र सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करावा लागला. यावेळी अजित पवार अनुपस्थित का राहिले याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.





