Bosnia : बोस्नियाच्या माजी अध्यक्षांना एक वर्षाची शिक्षा

साराजेव्हो : बोस्नियातील एका न्यायालयाने बुधवारी रशिया धार्जिणे बोस्निया सर्ब अध्यक्ष मिलोरॅड डोडिक यांना फुटीरतावादी कारवायांसाठी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि सहा वर्षांसाठी राजकारणात सहभागी होण्यास बंदी घातली. बोस्नियातील शांततेचे निरीक्षण करणाऱ्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय राजदूताची अवज्ञा केल्याच्या आरोपावरून डोडिक यांच्याविरुद्ध वर्षभर खटला सुरू होता.
या खटल्याची अंतिम सुनावणी झाल्यानंतर साराजेव्हो येथील न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. निकाल सुनावला गेला तेंव्हा डोडिक आणि त्यांचे वकिल न्यायालयात उपस्थित नव्हते. ही शिक्षा आपल्याला अमान्य आहे आणि या शिक्षेची अंमलबजावणी करणार नाही, असे डोडिक म्हणाले आहेत. या शिक्षेला प्रत्युत्तर म्हणून कठोर उपाययोजना करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे, त्यांनी दिलेल्या धमकीमध्ये बोस्नियामधील सर्ब-संचालित घटक रिपब्लिका सर्बला देशाच्या उर्वरित भागापासून वेगळे करण्याची धमकी देखील आहे.
डोडिक यांच्या फुटीरतावादी धमकीमुळे बोस्नियामध्ये भीती निर्माण झाली आहे.बोस्नियामध्ये १९९२-९५ दरम्यान झालेल्या वांशिक हत्याकांडात एक लाख लोक मारले गेले होते आणि लाखो लोक विस्थापित झाले होते. जवळजवळ तीन दशकांपूर्वी अमेरिकेने पुढाकार घेऊन घडवून आणलेल्या डेटन करारामुळे युद्ध संपले होते.





