Boris Nadezhdin : व्लादिमीर पुतिन यांना आव्हान देणारे विरोधी पक्षनेते बोरिस नादेझदिन दोषी
युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईवर उघडपणे टीका करणारे आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान देणारे विरोधी पक्षनेते बोरिस नादेझदिन (Boris Nadezhdin) यांना रशियाच्या न्यायालयाने 'अतिरेकी चिन्हे' प्रदर्शित केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

Boris Nadezhdin : युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईवर उघडपणे टीका करणारे आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान देणारे विरोधी पक्षनेते बोरिस नादेझदिन (Boris Nadezhdin) यांना रशियाच्या न्यायालयाने ‘अतिरेकी चिन्हे’ प्रदर्शित केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
डोलगोप्रुडनी येथील न्यायालयाने ६३ वर्षीय नादेझदिन यांना १,००० रूबलचा (सुमारे १३ अमेरिकन डॉलर्स) दंड ठोठावला. या निर्णयामुळे ते आगामी सप्टेंबर महिन्यातील संसदीय निवडणुकीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडले आहेत.
नादेझदिन (Boris Nadezhdin) यांच्यावरील हे आरोप २०२३ मधील एका ऑनलाइन मुलाखतीवर आधारित होते, ज्यात त्यांनी दिवंगत विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी यांचे छायाचित्र दाखवले होते. नवलनी यांचा फेब्रुवारी २०२४ मध्ये आर्क्टिकमधील तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता.
नादेझदिन (Boris Nadezhdin) यांनी आपल्यावरील आरोप हास्यास्पद असल्याचे सांगत फेटाळले असून, आपल्याला निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठीच अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचा युक्तिवाद केला आहे. तत्पूर्वी, रशियाच्या न्याय मंत्रालयाने नादेझदिन यांना ‘परदेशी एजंट’ म्हणून घोषित केले होते, ज्यामुळे त्यांना सार्वजनिक पद भूषवण्यास आधीच मनाई झाली होती. सुनावणी दरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना वैद्यकीय मदतही घ्यावी लागली होती. त्यांना सध्या रशिया सोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वी मार्च २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीतही त्यांनी युक्रेन युद्ध थांबवण्याच्या मागणीसह हजारो स्वाक्षऱ्या गोळा केल्या होत्या, परंतु तांत्रिक त्रुटींचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर क्रेमलिनने मानवाधिकार संस्था, स्वतंत्र प्रसारमाध्यमे आणि पुतिन विरोधी आवाजांना दाबण्याची दडपशाही तीव्र केली आहे.
माजी क्रेमलिन समर्थक इल्या रेमेस्लो यांना अटक
दुसऱ्या एका कारवाईत, सेंट पीटर्सबर्ग येथे इल्या रेमेस्लो या पुतिन यांच्या टीकाकाराला अटक करण्यात आली आहे. रेमेस्लो हे पूर्वी क्रेमलिन-समर्थक कार्यकर्ते आणि ब्लॉगर होते, परंतु नंतर त्यांनी पुतिन यांच्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर रशियन सैन्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, पुढील सुनावणीसाठी त्यांना मॉस्कोला नेण्यात येणार आहे. मार्च महिन्यात पुतिन यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर रेमेस्लो यांना महिनाभर मनोरुग्णालयातही राहावे लागले होते.






